संपर्क : 7454046894
अशा योगमार्गावर निष्ठेने अविरत चालण्याचा संकल्प करू या.

आज उपलब्ध असलेल्या अशा असंख्य पर्यायातून आपल्या ऋचीप्रमाणे, क्षमता व मर्यादांचा विचार करून मार्ग निवडावा. ज्या मार्गातून निखळ आनंद व समाधान मिळते व ज्यामुळे अन्य कोणालाही उपद्रव होत नाही, झाली तर मदतच होते तो मार्ग योग्य समजून त्याच्यावर निष्ठेने आणि चिकाटीने वाटचाल करावी. प्रामाणिक जिज्ञासेतून तो मार्ग जाणून घेत त्याची निरंतर साधना करत त्याला आत्मसात करावे. त्याला आचरणात आणून हळूहळू ती आपली जीवनपद्धती व्हावी असा प्रयत्न करावा. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे साधनेची पराकाष्ठा झाली की सिद्धी हात जोडून उभी राहाते.
ख्यातनाम कलासाधक किशोरीताई आमोणकर यांनी संगीत साधनेच्या बाबतीत जे सांगितले आहे ते योगसाधनेच्या बाबतीतही खरे आहे, त्या म्हणतात, “रागाच्या लक्षणात खूप फिरलात तरी रागाची केवल अंधुकशी रेषा दिसते. सततच्या साधनेत रेखाचित्र दिसायला लागतात. नंतर अवयव दिसू लागतात. त्याहीनंतर रागातले चैतन्य जाणवायला लागते. नंतरची पायरी अशी की रागच आपल्याला मार्गदर्शन करतो, ही काल्पनिक गोष्ट नव्हे, हा आत्मिक अनुभव आहे. कुठल्याही विषयाच्या सम्यक ज्ञानासाठी तपश्चर्या करावी लागते. योग्य मार्गाने केलेल्या तपश्चर्येतून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही गोष्टींची प्राप्ती होते असे ऋषींनी म्हटले आहे. मोक्ष म्हणजे पूर्णत्व, देहातीतता, परमानंद. एकाग्रतेत आपण क्षणभर आपल्याला विसरतो, ती स्थिती कायम राहाणे, तिच्या बाहेर न येणे हा मोक्ष.” अशा योगमार्गावर निष्ठेने अविरत चालण्याचा संकल्प करू या.