श्वास सजगता : प्राणायाम पूर्वतयारी

श्वसन ही शरिरात जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड सुरू असलेली क्रिया आहे. या क्रियेतील श्वास किंवा पूरकाच्या द्वारे हवेतील प्राणवायूच्या स्वरूपात शरिराला उर्जेचा पुरवठा होतो आणि प्रश्वास किंवा रेचकाद्वारे शरिरातील सूक्ष्म मळ असलेल्या रक्तातील कर्बाम्लवायूचे निष्कासन होते.
वातावरणातील हवा शरिरातील श्वसन यंत्रात प्रवेश करण्यासाठी श्वासनलिकेतला हवेचा दाब (758 mm hg) वातावरणातल्या हवेच्या दाबापेक्षा (760mm hg) कमी असतो, त्यामुळे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे या नियमाप्रमाणे वातावरणातून श्वासनलिकेत प्रवेश करते.
श्वसन प्रक्रिया
श्वासनलिकेतला हवेचा दाब कमी करण्यासाठी फुफ्फुसाच्या सभोवतालच्या स्नायूंचे आकुंचन कारणीभूत असते. पूरकाच्या कालावधीत ही क्रिया घडते. फासळ्यांच्या स्नायूंच्या (external intercostals muscles) आकुंचनामुळे फुफ्फुसांचे आडवे प्रसरण (horizontal expansion) होते, तर श्वासपटलाच्या आकुंचनाने (diafragm) फुफ्फुसांचे उभे प्रसरण होते (vertical expansion). रेचकाच्या कालावधीत, आकुंचन पावलेले स्नायू शिथिल होऊन पूर्वस्थितीत येतात (elastic recoil) व फुफ्फुसांचा संकोच होऊन श्वासनलिकेतला हवेचा दाब वातावरणातल्या हवेच्या दाबापेक्षा वाढतो आणि हवा श्वासनलिकेतून बाहेर जाते. ऐच्छिक व सखोल श्वसनामध्ये अतिरिक्त स्नायूंच्या (pectoralis minor & sternocleidomastoid lift lumgs upward, internal intercostals muscles pull horizontally & abdominal muscles like internal&external obliques, rectus abdominus pull lungs downwards) सहभागामुळे फुफ्फुसांचे आडवे व उभे प्रसरण व फुफ्फुसांचा संकोच अधिक प्रमाणात होतो.
स्नायूंच्या आकुंचनामुळे फुफ्फुसांचे बाह्य आवरण (Parietal plura) फासळ्यांकडे खेचल्या जाते, बाह्य आवरण व अंतर्गत आवरण (Visceral plura) यामध्ये असणार्याफ द्रावामुळे (serous fluid) अंतर्गत आवरणही फासळ्यांकडे खेचल्या जाते, त्यामुळे फुफ्फुसांचे आडवे व उभे प्रसरण होऊन श्वासनलिकेतला हवेचा दाब कमी होतो व हवा श्वासनलिकेत प्रवेश करते. फुफ्फुसांच्या प्रसरणातील सहजतेवर फुफ्फुसांची कार्यक्षमता (Compliance of the lungs) अवलंबून असते.
श्वसनक्रियेचे नियंत्रण
श्वासप्रश्वासाच्या या क्रियेचे नियंत्रण मेंदूकडून केल्या जाते. मेंदूतील लंबमज्जेत (Medulla) या क्रियेशी संबंधित लय नियंत्रण केंद्र (Rhythmicity center) असते. या केंद्रात दोन प्रकारच्या चेतापेशी (neurons) असतात. पहिल्या प्रकारच्या चेतापेशी (I neurons) श्वसनसहाय्यक स्नायूंच्या आकुंचनास चालना देवून श्वास\पूरकाचे नियंत्रण करतात, तर दुसर्यां प्रकारच्या चेतापेशी (E neurons) पहिल्या पेशींच्या कार्यास प्रतिबंध करून प्रश्वास\रेचकाचे नियंत्रण करतात. जेंव्हा अतिरिक्त ताणामुळे दम लागतो तेंव्हा मज्जासेतूमध्ये (Pons) असलेले केंद्र (Apneustic center) कार्यान्वित होवून वर उल्लेख केलेल्या पहिल्या प्रकारच्या (I neurons) चेतापेशींना चालना देतात व श्वसनाची गती वाढवतात. दम कमी होताच या (Apneustic center) केंद्राला प्रतिबंध करणारे केंद्र ( Pnumotaxic center) सक्रीय होवून श्वसनाची गती पूर्ववत करतात. मेंदूतील या केंद्रांना चालना देणारी कर्बाम्लवायूने प्रभावित होणारी रसायन संवेदक केंद्रे (Chemo receptors) मोठ्या धमनीत (Aorta) व कॅरॉटिड धमनीत असतात. रक्तातील कर्बाम्लवायूचे प्रमाण वाढताच ही केंद्रे उत्तेजित होवून मेंदूतील केंद्रांना चालना देतात.

फुफ्फुसातील व पेशीतील श्वसन
हवा प्रमुख श्वासनलिकेतून (Trachea), श्वासवाहिनीत (Bronchus), श्वासवाहिनीतून वायुवाहिनीत (Bronchiole) व शेवटी वायुकोषात (Alveolus) प्रवेश करते. तिथे हवेतील प्राणवायू केशवाहिन्यातील (capillary) रक्तात शोषल्या जातो, व रक्तातील कर्बाम्लवायूचे हवेत निष्कासन होते. वायुकोषांची संख्या सुमारे तीन कोटी असते व त्यांच्या आतील बाजूस केशवाहिन्यांचे जाळे असते. हवेचा या केशवाहिन्यांशी संपर्क येताच प्राणवायू व कर्बाम्लवायूचे रक्तातील व हवेतील प्रमाण व त्यामुळे निर्माण झालेल्या दाबातील फरकानुसार (pressure concentration gradient) विलयन (simple diffusion) होते. शरिरात वापरल्या गेल्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण (PO2-40mmhg) हवेतल्या प्राणवायूच्या प्रमाणापेक्षा (PO2-100mmhg) कमी असते तर शरिरात निर्माण झालेल्या कर्बाम्लवायूचे रक्तातील प्रमाण (PCO2-45mmhg) वायुकोशातल्या हवेतील प्रमाणापेक्षा (PCO2-40mmhg) जास्त असते. यामुळे दोन्हीकडचे प्रमाण सारखे होईपर्यंत प्राणवायू हवेतून रक्तात तर कर्बाम्लवायू रक्तातून हवेत शोषल्या जातो. अशीच क्रिया अभिसरणाद्वारे रक्त जेव्हा शरिरातील पेशींपर्यंत पोहोचते तेव्हा घडते. पेशीत वापरल्या गेल्यामुळे पेशीतील प्राणवायूचे प्रमाण रक्तातील प्राणवायूच्या प्रमाणापेक्षा कमी असते तर पेशीत निर्माण झालेल्या कर्बाम्लवायूचे प्रमाण रक्तातील कर्बाम्लवायुपेक्षा जास्त असते त्यामुळे दोन्हीकडचे प्रमाण सारखे होईपर्यंत प्राणवायू रक्तातून पेशीत तर कर्बाम्लवायू पेशीतून रक्तात शोषल्या जातो.

Vote: 
No votes yet
Language: 
Quiz: