संपर्क : 7454046894
पातञ्जल योगसुत्रे
भारतीय दर्शन परंपरेत मानवी जीवन व सभोवतालचे विश्व यांच्या खर्या स्वरुपाचा शोध घेणार्याप तत्वज्ञानाच्या सहा शाखा आहेत. दर्शन म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा नाही तर प्रत्यक्ष अनुभुती.न्याय(म. गौतम), वैशेषिक(म. कणाद), सांख्य(म. कपिल), योग, मिमांसा(म. जैमिनी) व वेदांत(म. बादरायण व्यास). या षडदर्शनापैकी योगदर्शनाची परंपरा हिरण्यगर्भापासून प्रारंभ होते असे मानण्यात येते. हिरण्यगर्भो योगस्य वक्ता, नान्य: पुरातन: ॥ याज्ञवल्क्य स्मृती, महाभारत 12.349.65 (हिरण्यगर्भाहून जुना योगाचा व्याख्याता अन्य कोणीही नाही.)
योगदर्शनाच्या परंपरेत महर्षी पतञ्जलींचे स्थान मोठे आहे. म. पतञ्जलींच्या काळाबद्दल इ.स.पूर्व 400 ते इ.स.400 अशी अनेक मतमतांतरे आहेत. पण सामान्यपणे हा काळ इ.स. पूर्व दुसरे शतक मानल्या जातो. म. पतञ्जलींनी गुरूशिष्य परंपरेतून संक्रमित झालेले ज्ञान संकलित व संपादित करून सुत्रबद्ध केले. सुत्रांच्या माध्यमातून शास्त्रविवेचनाची भारतीय परंपरा आहे. सूत्र म्हणजे धागा. बांधणारा, गुंडाळणारा. इथे हा धागा भौतिक नसून विचारांचा आहे. वायुपुराणात सुत्राची व्याख्या केली आहे.
“अल्पांक्षरं असंदिग्धं
सारवत विश्वतोमुखं
अस्तोभं अनवद्यंच
सुत्रं सूत्रविदो विदु:”
सुत्रांचे वैशिष्ठ्य म्हणजे कमीतकमी शब्दांमधून परंतु कुठलाही संदेह उरणार नाही अशा पद्धतीने ज्ञानाची मांडणी. पाली मध्ये सुत्राचे सुत्त झाले उदा. सुत्तपीटक.