मधुमेह व योग

मधुमेह व योग

मधुमेहाची प्रमुख कारणे

या विवेचनात प्रामुख्याने मध्यम वयात सुरू होणार्‍या मधुमेहाचाच Diabetes Mellitus विचार केला आहे. हे विवेचन मधुमेहाचे रुग्ण व सामान्य वाचक डोळ्यासमोर ठेऊन केले आहे, त्यामुळे क्लिष्ट शास्त्रीय विवेचन न करता सोप्या शब्दात काही मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. मधुमेहात निर्माण होणार्‍या प्रक्रियांचा विचार या आधी केला आहे. अशी स्थिती दोन कारणांमुळे उद्भवते. एक तर पुरेसे इंशुलीन शरिरात तयार होत नाही किंवा दुसरीकडे शरिरांतर्गत क्रियांमुळे रक्तातल्या साखरेत वाढ होते.

इंशुलीनचे अपुरे उत्पादन

जीवनशैलीतील बदलांमुळे गरजेपेक्षा जास्त आहार, व्यायामाचा अभाव, त्यातून निर्माण होणारा लठ्ठपणा यामुळे इंशुलीनची मागणी वाढते व ते तयार करणार्‍या स्वादुपिंडावर Pancreas ताण पडतो व हळूहळू त्या ग्रंथीची इंशुलीन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते, परिणामत: पुरेसे इंशुलीन तयार होत नाही.

रक्त शर्करेत वाढ

शारीरिक किंवा मानसिक ताण वाढल्यास शरिरात आणिबाणीची स्थिती निर्माण होते व अशा स्थितीशी सामना करण्यासाठी व शरिराला अतिरिक्त इंधन पुरवण्यासाठी अधिवृक्क ग्रंथी Adrenal glands सक्रीय होतात व पेशींतर्गत व अन्यत्र साठवलेली साखर रक्तात पाठवल्या जाते व रक्तशर्करेत वाढ होते. जीवनशैलीत अचानक निर्माण झालेल्या ताणतणावांमुळे उद्भवणारा मधुमेह, गरोदरपणी उदभवणारा मधुमेह व दीर्घकाल steroids च्या वापरामुळे उदभवणारा मधुमेह या प्रकारात मोडतात.

उपचारात योगाचे महत्व

नियमित व शास्त्रीय पद्धतीने केलेल्या योगाभ्यासाने या दोन्ही कारणांचे निवारण होण्यास सहाय्य होते. योगाभ्यासामुळे जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणण्याची मानसिकता निर्माण होते व जीवनातील ताण तणावांवर नियंत्रण मिळवण्यात यश येते.

आसने

सूक्ष्म व्यायाम किंवा पवनमुक्तासन श्रेणीच्या हालचालीतून, सूर्यनमस्काराच्या अभ्यासातून लठ्ठपणा कमी होऊन इंशुलीनच्या वापरातला गतिरोध दूर होतो. उदर आणि पाठीच्या हालचालींनी, वज्रासन श्रेणीच्या आणि भुजंगासन, धनुरासन, सेतुबंधासन, अर्धमत्सेंद्रासन, पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, मयुरासन अशा विविध आसानांनी स्वादुपिंडाची कार्यक्षमता व एकूण आरोग्याच्या पातळीत सुधारणा होते. विश्रामाच्या आसनांनी शरीर तणावमुक्त होते.

प्राणायाम व शुद्धीक्रिया

नाडीशोधन ही प्राणायाम पूर्वतयारीची क्रिया, भस्रिका, भ्रामरी, शीतली आणि सित्कारी सारखे प्राणायाम या व्याधीच्या निवारणात लाभदायक आहेत. नेती, जलधौती व ल्घुशंखप्रक्षालन इ. शुद्धीक्रियाही लाभदायक आहेत.

योग एक जीवनपद्धती

अंतरंग योगातील योगनिद्रा, अजपाजप इ. प्रक्रियांचा व ध्यानाचा अभ्यास तणाव नियंत्रणासाठी व जीवनाकडे पाहाण्याची एक संतुलित व परिपक्व दृष्टी विकसित होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यातून व्याधीमुळे उदभवलेला उद्वेग व संताप कमी होतो, नष्टही होऊ शकतो.

संशोधनांती सिद्ध

मधुमेहाच्या उपचारात योगाच्या लाभांविषयी जगभर व्यापक संशोधन झाले आहे व त्यातून योगाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. उदाहरणादाखल काहींचा उल्लेख करीत आहे.
1. Paper published in Indian journal ofclinical biochemistry by Savita Sing et.
2. Controlled clinical study undertaken by American diabetes association under Diabetic care programme by Shrelaxmi Hegde et. Proved that Yoga reduces oxidative stress, reduce BMI & improve glycemic index.
3. Extensive research done by SVYAS under stop diabetes campaign.

योगाभ्यासाची योग्य पद्धत

वरील विवेचन खरे असाले तरी ते वाचून किंवा पुस्तकातून वाचून, CD किंवा Utube पाहून मनाने योगाभ्यास करू नये. प्रशिक्षित व तज्ञ योगशिक्षकांकडूनच योगाभ्यास शिकावा, अन्यथा समस्या व त्रास होऊ वा वाढू शकतो. तसेच योगाभ्यास सुरू केला म्हणून मनानेच औषधोपचार बंद करू नयेत, त्याचा निर्णय तुमच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांवर सोडावा. नियमित तपासणी व रक्ताच्या चाचण्या सुरू ठेवाव्या, योगाभ्यासाने लाभ होतो की नाही हे त्यातूनच कळेल.
योगाभ्यासाचे परिणाम औषधासारखे तात्काळ होत नाहीत, त्यासाठी योगाभ्यास अपेक्षित पद्धतीने करता येणे, त्यात पुरेशा कालावधीपर्यंत थांबता येणे व अशा पद्धतीने दीर्घ काल त्याचा सराव करण्याची गरज असते याचे भान ठेऊन चिकाटीने व धीराने अभ्यास सुरू ठेवावा म्हणजे निश्चित लाभ होईल.

Vote: 
Average: 3.2 (5 votes)
Language: 
Quiz: